कोडोलीत नागरी वस्तीत आलेल्या मगरीला नागरिकांनीच लावलं हुसकावून
कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील कोडोली ते पोखले मार्गावर वारणा उजवा कालवा आहे. या कालव्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मगरींचे वास्तव्य आहे. कॅनॉल परिसरामध्ये वडर यांची वस्ती आहे, रात्रीच्या सुमारास वडर यांच्या घराच्या अगदी भिंतीला लागून एक मगर पडून होती. ही मगर तिथून रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या लोकांना दिसून आली. ही सुस्तावलेली मगर साधारणपणे एक तासभर त्याचठिकाणी होती. मगर पाहण्यासाठी स्थानिकांची मोठी गर्दी झाली होती.
स्थानिक नागरिकांनी पन्हाळा वनविभागाचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून त्यांना संपर्क करण्याचा बराच वेळ प्रयत्न केला. पण वनविभागाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी कोडोली पोलिसांना याबाबतची माहिती दिली. कोडोली पोलिसांनी देखील पन्हाळा वनविभागाला फोन केले. मात्र वनविभागाकडून फोन उचलण्यात आला नाही. अखेर स्थानिक नागरिकांनी जमिनीवर काठ्या आणि दगड मारून या मगरीला तिथून हुसकावून लावलं आणि सुटकेचा निश्वास सोडला. नागरी वस्तीमध्ये एखादा वन्य प्राणी शिरला तर जनतेने काय उपाययोजना कराव्यात आणि वन विभागाशी ताबडतोब कसा संपर्क साधावा, याबाबत कोणतीच माहिती सर्वसामान्य नागरिकांना नाही. दिवसेंदिवस वन्य प्राण्यांकडून नागरी वस्तीतील लोकांना आणि शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. याबाबत वनविभागाने जागरूकतेने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.