दाजीपूर अभयारण्य सफारी आजपासून सुरू…स्थानिकांच्या मागणीला यश
कोल्हापूर - दरवर्षी १ जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी ऋतूत पर्यटकांसाठी दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद केले जाते. यावर्षी गोकुळ संचालक अभिजीत तायशेटे यांच्यासह स्थानिकांनी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. स्थानिकांच्या मागणीमुळे एक आठवडा अगोदरच अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. त्यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सध्या तालुक्यात पावसाचे वातावरण आहे जीप जिथेपर्यंत जातील तिथे जाईल तिथे पर्यंत सफारीचा आनंद घेता येणार आहे. सकाळी ६ वाजता सफारीला सुरुवात होणार असून दुपारी अडीच वाजेपर्यंत जंगल सफारीसाठी प्रवेश मिळणार आहे. सफारीसाठी खासगी वाहनांना प्रवेश मिळणार नाही, प्रत्येक मंगळवारी साप्ताहीक सुट्टी असणार आहे. जंगल सफारीमध्ये ढाक्याचा वाडा, मुरडा वाडा, लक्ष्मी तलाव, वाघांचे पाणी, सांबर कुड, हाडाक्याचे सरी, सापळा, सावराई सडा असे नैसर्गिक पाणवठे निरीक्षण मनोरे पाहता येणार आहे. अभयारण्यात दुचाकी, खासगी वाहनांना बंदी असणार आहे. स्थानिक परिसर समिती आणि वन्यजीव समितीमार्फत स्थानिकांच्या खुल्या आणि बंदीस्त जीपमधून सफारी करता येणार आहे. राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्य पाहण्यासाठी दिवाळीची सुट्टी असल्याने पर्यटकांचा प्रतिसाद वाढणार आहे.