कोल्हापुरात दिनमान साहित्य उत्सव माध्यमातून साहित्यिक, कलावंतांची मैफल रंगणार

<p>कोल्हापुरात दिनमान साहित्य उत्सव माध्यमातून साहित्यिक, कलावंतांची मैफल रंगणार</p>

कोल्हापूर –  येत्या रविवारी आणि सोमवारी कोल्हापुरात दिनमान साहित्य उत्सव होणार आहे. या उत्सवात हिंदी, मराठीतील नामवंत साहित्यिक आणि  कलावंत सहभागी होणार आहेत.
हिंदीतील ज्येष्ठ कवयित्री गगन गिल, अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे. यावेळी हिंदीतील ज्येष्ठ कवी डॉ. बोधिसत्त्व, ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, आ. सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यावेळी निर्माते रामदास फुटाणे, कवयित्री गगन गिल, डॉ. बोधिसत्त्व, प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक, शाहू पाटोळे आणि धनंजय बिजले यांची दिलखुलास मुलाखत रंगणार आहे.
सायंकाळी चार वाजता नामवंत कवींची काव्यमैफल रंगणार आहे. त्यामध्ये सौमित्र उर्फ किशोर कदम, अरुण म्हात्रे, आभा बोधिसत्त्व, मोनिका सिंग, संदीप माळवी, सुमती लांडे, अभिनेता मिलिंद शिंदे, प्रशांत मोरे, प्रकाश होळकर, संजीवनी तडेगावकर आणि अपूर्व राजपूत सहभागी होणार आहेत.
या सत्रामध्ये नामदेव माळी यांचे शंकर पाटील यांच्या साहित्यावर व्याख्यान होईल. शंकर पाटील यांच्या कथेचे कथाकथन बाबासाहेब परीट करणार आहेत. अभिनेते मिलिंद शिंदे एका कथेचे अभिवाचन करतील. तिसरी घंटा या रंगकर्मी समूहाच्यावतीने पाळणा या कथेवरील एकांकिका सादर केली जाईल. कथा अकलेच्या कांद्याची या नाटकातील प्रवेश शिवाजी विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी सादर करणार आहेत.