पन्हाळा तालुक्यातील कोदवडेत पावसामुळे सुमारे अडीच लाखांचे नुकसान

<p>पन्हाळा तालुक्यातील कोदवडेत पावसामुळे सुमारे अडीच लाखांचे नुकसान</p>

कोल्हापूर - गेले तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम होती. या अतिवृष्टीमुळे पन्हाळा तालुक्यातील कोदवडे येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शेतकऱ्यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 इथले शेतकरी मारुती परीट यांच्या कडील जनावरांचे शेड मोडकळीला आल्यामुळे ते त्यांच्याकडील गाभण गाय गावातीलच नथुराम गणपती शियेकर यांच्या जनावरांच्या शेडमध्ये बांधत होते. मात्र दुर्दैवाने अतिवृष्टीमुळे शियेकर यांचे शेड पडले आणि त्यांच्या शेडमध्ये बांधलेली परीट यांची गाय जागीच मृत्यूमुखी पडली. या दुर्घटनेत परीट यांचे सुमारे एक लाख दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ विजय सावंत, कोतवाल दीपक दळवी, शिवसेना तालुका उपप्रमुख प्रशांत पोवार, सरपंच पौर्णिमा ढेरे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.

 नऊ महिन्यांची गाभण काय मृत्यूमुखी पडल्यामुळे परीट यांना मोठा आर्थिक फटका बसलाय तर शियेकर यांच्या शेडचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुसऱ्या एका घटनेत सतरा ऑगस्टच्या रात्री गावातील विठाबाई बंडू डकरे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळलीय. सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झाली नसली तरी डकरे यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सरपंच पौर्णिमा ढेरे, उपसरपंच अजित डवंग, पोलिस पाटील सुरेखा पंडित कांबळे, महसुल विभागाचे कोतवाल दीपक दळवी यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी करत पंचनामा केलाय. कोदवडे गावातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये झालेल्या नुकसानी बद्दल पशुपालक मारुती परीट, शेतकरी नथुराम शियेकर आणि विठाबाई डकरे यांना शासनानं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.