जवान साताप्पा मिसाळ यांना अखेरचा निरोप...

 मिसाळवाडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

<p>जवान साताप्पा मिसाळ यांना अखेरचा निरोप...</p>

कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील पडळीपैकी मिसाळवाडी गावातील साताप्पा गोविंद मिसाळ भारतीय सैन्य दलात फिरोजपुर पंजाब आर्टलरी रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. रविवारी १७ ऑगस्ट रोजी सेवेत असताना विजेच्या धक्क्‌याने त्यांचा मृत्यू झाला. होता. आज त्यांचं पार्थिव पंजाबमधून विमानाने कोल्हापुरात आणण्यात आले.

कोल्हापुरातून त्यांची सासुरवाडी असलेल्या आणाजे येथे  सकाळी साडे दहा वाजता त्यांचं पार्थिव आणले . यावेळी आणाजे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी त्यांचे पार्थिव असणाऱ्या वाहनावर फुलांचा वर्षाव करत पुष्पांजली वाहिली. लक्ष करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसह तरुणांनी आणाजे गावापासून घोषणा देत अंत्ययात्रेला सुरुवात केली. पार्थिव मिसाळवाडी  येथे आणल्यानंतर ग्रामस्थांसह नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. वीर जवान तुझे सलाम, अमर रहे अमर रहे साताप्पा पाटील अमर रहे, जय जवान जय किसान.. च्या घोषणा देत आणाजे ते दुर्गमानवाड मार्गे मिसाळवाडी पर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली.

१०९ टी ए बटालियनच्या जवानांनी मानवंदना दिली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडून कल्याण संघटक सुबेदार मेजर सुहास कांबळे, नायब तहसीलदार सुबोध वायगंकर यांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सरपंच सुरेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती मोहन पाटील, बिद्रीचे संचालक राजेंद्र भाटळे, गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन अबिटकर, ए वाय पाटील, कॅप्टन अनिल देसाई, शिवाजी शेटके, तानाजी खाडे, लक्ष्मीकांत हांडे, संतोष कुमार, महादेव जाधव आदि उपस्थित होते.