के.एम.टी. उपक्रमाचा सन २०२६-२७ चा नवीन अंदाजपत्रकीय आराखडा सादर...
कोल्हापूर - महानगरपालिकाकेच्या परिवहन उपक्रमाच्यावतीने सन २०२५-२०२६ चा सुधारीत आणि सन २०२६-२०२७ चा नवीन अंदाजपत्रकीय आराखडा सादर करण्यात आला. आयुक्त तथा परिवहन व्यवस्थापक के. मंजूलक्ष्मी यांनी हा आराखडा परिवहन समितीचे सभापती सत्यजीत जाधव यांच्याकडे मान्यतेसाठी सुपूर्द केला. अंदाजपत्रकात ७४ कोटी १२ लाख रुपये महसूली जमा, तर ७४ कोटी रुपयांच्या आसपास महसूली खर्च प्रस्तावित करण्यात आला असून, सुमारे ११ लाख ४५ हजार रुपयांची शिल्लक अपेक्षित आहे. भांडवली जमा ३० कोटी ८१ लाख रुपये तर खर्च २९ कोटी ६४ लाख रुपये असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
२०२६-२७ या वर्षात के.एम.टी. ताफ्यात ६५ डिझेल बसेस आणि पीएम ई-बस सेवा अंतर्गत पहिल्या टप्प्यातील ४० इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. यामुळे दररोज सुमारे ८८ बसेस मार्गावर धावतील असे नियोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शहरातील प्रमुख बस थांब्यांचे आधुनिकीकरण, सौंदर्याकरण तसेच प्रमुख पार्किंग ठिकाणांपासून श्री अंबाबाई मंदिरपर्यंत शटल बस सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सोबतच डेटा आधारित मार्ग नियोजन, ताफा वापर ९० टक्क्यांपर्यंत वाढविणे, बस नादुरुस्ती कमी करणे आणि चालकांना प्रशिक्षण देणे, यासारखी उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे. याबाबतची माहिती परिवहन समितीचे सभापती सत्यजित जाधव यांनी दिली.
महिलांसाठी पिंक बस ची सोय करण्यात येणार असल्याचे सभापती जाधव यांनी सांगितले. या बैठकीला परिवहन समिती सदस्य दुर्वास कदम, उमेश पोवार, मानसी लोळगे, श्रीधर गाडगीळ, प्रसाद जाधव, हेमंत आराध्ये, महेंद्र कोरडे, अक्षय शेळके, उपआयुक्त परितोष कंकाळ, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक, प्रकल्प अधिकारी पी.एन. गुरव, लेखापाल राजेंद्र सुर्यवंशी, संतोष लोखंडे आदि उपस्थित होते.