कागल सीमा तपासणी नाक्यावरील अपघातानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे कार्यकर्ते संतप्त
कोल्हापूर - कागल सीमा तपासणी नाक्याच्या पूर्व बाजूस कागल-निपाणी मार्गावर गेल्या आठवडाभरात तीन अपघात होऊन त्यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास कोगनोळी येथील एका इसमाचा अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ कोल्हापूरात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती कागल शहरात समजताच शिवसेना उबाठा पक्षाचे कागल शहराध्यक्ष अजित मोडेकर, म्हाळू करिकट्टे, तालुका प्रमुख जयसिंग टिकले, वाहतूक संघटनेचे मल्हार पाटील, वैभव मोडेकर, यांच्यासह कार्यकर्त्यांनी सीमा तपासणी नाक्यावर धाव घेऊन आरटीओ प्रशासनाला जाब विचारला. काही संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील अडथळे लाथा मारून बाजूला फेकून देत नाक्याकडे जाणारी वाहतूक थेट सुरू केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान कागल पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर अडथळे पुन्हा झिगझेंग पद्धतीने लावण्यात आले. दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मार्ग देत अवजड वाहने नाक्याकडे वळविण्यात आली.
यानंतर कार्यकर्त्यांनी कागल पोलीस ठाण्यात जाऊन आरटीओ प्रशासनाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्याकडे केली आहे. अखेर सीमा तपासणी नाक्यावरील वाहतुकीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सोमवारी आरटीओ प्रशासन आणि आंदोलक यांची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.