सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात नव्या 'शिलेदारा'ची डरकाळी...
मुंबई - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून एका नवीन वाघाचा वावर दिसून येत होता. त्याचे विविध कोन आणि हालचाली टिपणारी छायाचित्रे आणि चित्रीकरण वनविभागाच्या हाती लागले आहेत. या पुराव्यांच्या तांत्रिक विश्लेषणानंतर हा वाघ या परिसरातील सातवा वाघ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या या व्याघ्र प्रकल्पात एक रंजक स्थिती निर्माण झालीय या प्रकल्पातील T५ म्हणजेच तारा या वाघिणीच्या क्षेत्रात सध्या नवीन आलेल्या 'शिलेदार'सह सेनापती आणि सुभेदार या तीन नर वाघांचा वावर आहे. शिलेदार सध्या ताराच्या मागावर असून, तिच्या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. निसर्गाच्या या चक्रात आता तारा कोणत्या नराची निवड करते, याकडे वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष असून, त्यांचे कुतूहल वाढले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. 'T९' च्या रूपाने प्रकल्पात एका सक्षम नर वाघाची भर पडली आहे. एकाच वाघिणीच्या क्षेत्रात तीन नरांचा वावर असणे, हे या जंगलातील भक्ष्याची उपलब्धता आणि उत्तम अधिवासाचे लक्षण आहे. त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले.
हा नवा वाघ म्हणजे सह्याद्रीच्या समृद्ध जैवविविधतेचे प्रतिक आहे. राधानगरी, तिलारी आणि दोडामार्ग हे कॉरिडॉर वाघांच्या प्रजननासाठी आणि त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी 'लाईफलाईन' ठरत आहेत. या कॉरिडॉरमुळंच वाघांचे स्थलांतर सुलभ होत असून, सह्याद्रीचे जंगल पुन्हा एकदा व्याघ्रसंपन्न होत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला दक्षिण महाराष्ट्रातील इतर जंगलांशी जोडणारे कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.