कागल शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गाबाबत बैठक संपन्न...
कोल्हापूर - महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन या कंपनीचे अधिकारी आणि कागल नगरपरिषद प्रशासन यांच्यात बैठक झाली. या बैठकीत यळगूड ते निढोरी या कागल शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गाच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या, गटर बांधकाम, बारा मीटर रुंदींचा काँक्रीटचा रस्ता करणे, महावितरणच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे तसेच वाहतूक नियमनाबाबत नियोजन करणे याबाबतही चर्चा करण्यात आली.
कागलमधील रस्त्यालगतच्या अतिक्रमणांबाबत नगरपालिका पदाधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्या स्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून रस्ता मार्गाचा आराखडा निश्चित करून क्षेत्रफळानुसार दुतर्फा खुणा करण्यात येणार आहे. रस्ता कामादरम्यान बाधित होणाऱ्या घरांना मोबदला देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता एकेरी मार्गाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या राज्य मार्गाचा मौजे सांगाव ते कागल हद्दीतील सांगाव नाका पर्यंतचा भाग पूर्ण झाला असून, सांगाव नाका ते बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतचा काँक्रीट रस्ता तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. काम सुरू असताना एसटी वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले असून प्रवासी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी केले आहे.
या बैठकीला एमएसआयडीसीचे प्रोजेक्ट मॅनेजर श्रीशल मलकुड, सतीश चौगुले, अभियंता अर्जुन बिरादार, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, मुख्याधिकारी अजय पाटणकर, भैय्या माने, चंद्रकांत गवळी, वीज वितरणचे ए. आळवेकर, अभिजीत चव्हाण, पोलीस निरीक्षक बी. एस. पाटील, अरुण लाड, सुनील पाटील यांच्यासह नगरपालिका पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.