छ. शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकर विरोधातील तपास अपूर्ण का? : इंद्रजित सावंतांची पोलिसांना नोटीस
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन एक वर्ष झाले, पण अद्याप या गुन्ह्याचा तपास का पूर्ण झालेला नाही, असा सवाल इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी उपस्थित केला आहे. यासाठी त्यांनी कोल्हापूर पोलिसांना ॲड.असीम सरोदे, ॲड श्रीया आवले, ॲड योगेश सावंत, ॲड. हेमा काटकर आणि ॲड. सकलेन मुजावर यांच्यामार्फत नोटीस पाठवली आहे.
प्रशांत कोरटकर विरोधात एक वर्ष होवून देखील गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन चार्जशीट दाखल झाली की नाही याबाबत स्पष्टता नसल्याचे नोटीसात म्हटले आहे. न्यायालयाने जामीन देतांना प्रशांत कोरटकरवर ज्या अटी घातल्या त्यांचे पालन होतेय का?, प्रशांत कोरटकर हा महाराष्ट्रात आहे कि दुबईत पळून गेला आहे? असे अनेक प्रश्न इंद्रजित सावंत यांनी उपस्थित केले आहेत. पोलीस जर प्रामाणिक आणि पारदर्शक भूमिकेतून तपास करण्याची त्यांची कायदेशीर जबाबदारी पाळत नसतील तर आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.