लव्ह जिहादविरोधी कायदा कठोर करा : कागल तालुका सकल हिंदू समाजाची मागणी
कोल्हापूर - महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने १४ फेब्रुवारी २०२५ रोजी लव्ह जिहाद आणि फसवणूक किंवा बलपूर्वक करण्यात येणारे धर्मांतरण रोखण्याच्या अनुषंगाने कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता. या समितीमार्फत राज्यातील परिस्थितीचा अभ्यास करून तक्रारींचा आढावा घेणं, इतर राज्यांतील कायद्यांचा अभ्यास करणं आणि आवश्यक असल्यास कायद्याचा मसुदा तयार करणं अपेक्षित होते. मात्र, या निर्णयाला वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे राज्यात लव्ह जिहाद, फसवणूक अथवा बलपूर्वक धर्मांतरणाच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर कायदा करावा, अशी मागणी कागल तालुका सकल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी कागल पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार यांना दिले आहे.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये संबंधित विषयावर कायदे अस्तित्वात असताना महाराष्ट्रात अद्याप ठोस कायदेशीर तरतूद नसल्याने पीडित महिलांना न्याय मिळण्यात अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी राजश्री पोवार, सानिका मगदूम, योगिता मोरे, संगीता निकम, शोभा खोत, मीरा कुन्नूर, रूपाली पाटील, श्रुती भिसुरे, रंजना गुरव, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.