... तर भारतात व्यवसाय करता येणार नाही : सुप्रीम कोर्टाने व्हॉट्सअॅपला ठणकावलं
नवी दिल्ली - ओटीटी मॅसेजिंगचा गैरवापर केल्या प्रकरणी स्पर्धा आयोगाने मेटाला २१३ कोटीचा दंड ठोठावला होता. हा दंड आणि डेटा शेअरिंगचे निर्बंध चुकीचे आहेत, असे सांगत त्याविरूध्द मेटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली.
सुनावणी दरम्यान न्यायालयाने डेटा प्रायव्हसी, डेटा वापर आणि त्याच्या आर्थिक मूल्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी, युजरचा गोपनीयता हा मूलभूत अधिकार असून त्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगितले. संविधनाचे पालन करणार नसाल तर भारतात व्यवसाय करता येणार नाही, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने व्हॉट्सअॅप आणि त्याची मूळ कंपनी मेटाला ठणकावले. युजरचा डेटा कोणत्याही प्रकारे शेअर केला जाणार नाही, याबाबत लेखी हमी देणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने मेटाला दिले आहेत. प्रतिज्ञापत्र दिले नाही तर याचिका फेटाळली जाऊ शकते, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे. व्हॉटसअॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीवरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. मुख्य न्यायाधीशांनी ही पॉलिसी भ्रामक आणि सामान्य माणसाला न समजणारी असल्याचे सांगितले.