पानिपतमध्ये शहीद झालेल्या वीरांसाठी मराठा शौर्य दिवसाचे आयोजन

 

<p>पानिपतमध्ये शहीद झालेल्या वीरांसाठी मराठा शौर्य दिवसाचे आयोजन</p>

<p> </p>

कोल्हापूर - विदेशी शत्रू अब्दाली सोबत प्रतिकूल परिस्थितीत मराठे लढले आणि आपले शौर्य दाखवले, याचा सार्थ अभिमान असल्याचे, प्रतिपादन हरियाणा विधानसभेचे सभापती हरविंदर कल्याण यांनी केले आहे.  ते पानिपत येथील शौर्य भूमी बसताडा येथे आयोजित मराठा शौर्य दिवस कार्यक्रमात बोलत होते.

अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यासह बारा राज्यातून मराठी बांधव उपस्थित होते.  बसताडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पानिपतमधील १७६१ च्या युद्धातील शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हरियाणाच्या रोड मराठ्यांची मातृ संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत यांच्यावतीने दरवर्षी मराठा शौर्य दिवस साजरा करण्यात येतो. नुकताच हा शौर्य दिवस पानिपतमधील बसताडा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचे हे २४ वे वर्ष होते. या कार्यक्रमास हरियाणाचे विधानसभा सभापती हरविंदर कल्याण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यासह बारा राज्यातून मराठी बांधव उपस्थित होते. कर्नाल इथून भव्य रॅलीने याची सुरुवात करण्यात आली. यानंतर कार्यक्रम स्थळी भगव्या झेंड्याचे ध्वजारोहण होऊन सर्व शहीद वीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी बोलताना हरविंदर कल्याण यांनी, पानिपत युद्धाच्या इतिहासाला उजाळा दिला. विदेशी शत्रू अब्दाली याच्यासोबत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मराठ सैनिक लढले आणि  आपले शौर्य, आपला पराक्रम त्यांनी दाखवून दिला. याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. यासह याठिकाणी छत्रपती शिवरायांचे स्मारक करण्यास सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मंचचे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र मराठा यांनी रोड मराठा हा मूळचा महाराष्ट्रीयन असून तसे संशोधनातून सिद्ध झाल्याचे  सांगितले. लढाईत मराठ्यांचे  मुख्य केंद्र बसताडा होते. म्हणून बसताडा शौर्य तीर्थ बनवण्याची योजना असल्याचे त्यांनी जाहीर केले.

बसताड्याचे सरपंच सुरेश मराठा यांनी, शिवस्मारकासंदर्भात सर्वतोपरी सहकार्य करू असे सांगितले. संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक कोल्हापूरचे मिलिंद पाटील यांच्या हस्ते महाराणी छत्रपती ताराराणी यांची प्रतिमा भेट देत अनेकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार रणधीर गोळे, स्वामी संपूर्णानंद, कोल्हापूर हून श्रीकांत पाटील, राहुल गावडे, मंदाकिनी कोडक, शबाना पाटणकर, सोनी औंधकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि रोड मराठा बांधव उपस्थित होते.