सोनम वांगचुक यांच्या अटके प्रकरणी सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस...
पुढील सुनावणी १४ ऑक्टोबरला

नवी दिल्ली – लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी वांगचुक यांच्या अटके प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली यावर कोर्टाने, पतीच्या अटकेची कारणे आणि पूर्वसूचना अंगमो यांना का देण्यात आली नाही, असे म्हणत केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. यावरील पुढील सुनावणी १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
लडाखमध्ये झालेल्या हिंसक संघर्षांनंतर वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईला गीतांजली अंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अंगमो यांनी कलम ३२ अंतर्गत दाखल केलेली रिट याचिका ही जोधपूरच्या तुरुंगात बंदिस्त असलेल्या वांगचुक यांच्या सुटकेसाठी एक हेबियस कॉर्पस याचिका आहे. या याचिकेनुसार, अंगमो यांनी कलम २२ अंतर्गत अटकेला बेकायदेशीर म्हणून आव्हान दिले आहे, कारण त्यापैकी दोघांनाही अटकेचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. केंद्र सरकार, लडाख प्रशासन आणि जोधपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक या याचिकेत प्रतिवादी आहेत.