इराण - अमेरिका-इस्रायल युद्धविरामाची शक्यता कमीच..?
२१ तासांची चर्चा ठरली निष्फळ
नवी दिल्ली – पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात २१ तास चर्चा झाली पण ही चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे सध्या युद्धविराम असला तरी हा विराम कायम राहण्याची शक्यता कमीच आहे.
या चर्चेबाबत इराणच्या दूतावासाने एक्सवर एका पोस्टद्वारे माहिती दिली आहे कि, तेहरानने अमेरिकेच्या मागण्यांना “मोठा नकार” दिला आहे. वॉशिंग्टनवर आरोप करताना दूतावासाने म्हटले की, अमेरिका केवळ चर्चेतून बाहेर पडण्यासाठी “निमित्त शोधत” होती आणि ज्या सवलती त्यांना युद्धाद्वारे मिळवता आल्या नाहीत त्या ते आता मागण्यांतून मिळवू पाहत होते.
अमेरिकनचे शिष्टमंडळ रिकाम्या हाती परतले असून होर्मुझची सामुद्रधुनी अजूनही बंदच आहे. यातून महत्त्वाचे मुद्दे अद्याप सुटलेले नसल्याचे अधोरेखित होते. इराणने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, त्यांनी अमेरिकेच्या अवाजवी मागण्या मान्य करण्यास नकार दिला आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स यांनी चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले, इराणने अमेरिकेच्या अटी मान्य न केल्यामुळे कोणताही करार होऊ शकला नाही. आम्ही कोणत्याही करारापर्यंत पोहोचलेलो नाही. त्यांनी आमच्या अटी स्वीकारण्यास नकार दिला आहे. प्रदीर्घ चर्चेनंतर अमेरिकेने आपली अंतिम आणि सर्वोत्तम ऑफर दिली होती आणि संपूर्ण वाटाघाटी दरम्यान अमेरिकेच्या शिष्टमंडळाने बरीच लवचिकता दाखवली होती. मुख्य मुद्दा इराणच्या अणू कार्यक्रमाचाच आहे. तेहरान अण्वस्त्रे बनवणार नाही, याबाबत त्यांनी स्पष्ट आणि दीर्घकालीन वचनबद्धता द्यावी, अशी वॉशिंग्टनची मागणी आहे. “आम्हाला त्यांच्याकडून केवळ आत्तासाठीच नव्हे, तर दीर्घकाळासाठी एक सकारात्मक वचन हवे आहे,” असेही त्यांनी नमूद केले आहे. या सर्व चर्चेतून तोडगा निघाला नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या युद्धविरामाचा शेवट काय होतो हे बघावे लागणार आहे.