अमेरिका–इराण संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का; तेल दरवाढीमुळे मंदीची भीती वाढली

जागतिक पातळीवर अनिश्चिततेचं सावट; वर्ल्ड बँकेकडून गंभीर इशारा

<p>अमेरिका–इराण संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का; तेल दरवाढीमुळे मंदीची भीती वाढली</p>

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अचानक मोठी उसळी दिसून येत असून दर जवळपास 100 डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर पोहोचल्याचे समोर आले आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर वर्ल्ड बँकेकडून गंभीर इशारा देण्यात आला आहे. सध्याची परिस्थिती ही केवळ सुरुवात असून युद्ध किंवा तणाव संपला तरी त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकू शकतात. असे वर्ल्ड बँकेचे प्रमुख अजय बंगा यांनी स्पष्ट केले आहे. तात्काळ युद्धविराम झाला तरी जागतिक आर्थिक वाढ 0.3 ते 0.4 टक्क्यांनी घटू शकते. मात्र संघर्ष अधिक तीव्र झाल्यास ही घट 1 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते, ज्याचा थेट परिणाम जागतिक व्यापार, ऊर्जा बाजार आणि गुंतवणूक क्षेत्रावर होणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत असून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भारतासह अनेक देशांच्या आयात-निर्यात व्यवहारांवरही याचा परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एकूणच, अमेरिका–इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीने जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली असून पुढील काळ अधिक आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.