इराणच्या ‘या’ तीन अटी पूर्ण झाल्यास युद्ध थांबण्याची शक्यता..!
नवी दिल्ली – आखाती देशात सुरु असलेल्या युद्धामुळे जगातील अनेक देशांवर तेलाची मोठी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होवू लागला आहे. तसेच पेट्रोल, डीझेल, आणि गॅस सिलेंडरच्या वाढत्या तुटवड्यामुळे जनतेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आखाती देशांनी युद्ध थांबवावे अशी भावना अनेक देशांमधून व्यक्त केली जात आहे . या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांनी युद्ध थांबवण्यासाठी तीन प्रमुख अटी ठेवल्या आहेत.
इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर विधान केले आहे. रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, इराण क्षेत्रात शांतता इच्छितो, पण अमेरिका आणि इस्रायलच्या कारवायांमुळे युद्ध सुरू झाले. ते म्हणाले, "इराणच्या वैध हक्कांची मान्यता, युद्धातील नुकसानीची भरपाई आणि भविष्यातील हल्ल्यांविरोधात ठोस आंतरराष्ट्रीय हमी मिळाल्यासच युद्ध थांबेल."
पहिली अट-
पेजेशकियन यांनी सांगितले की, इराणच्या कायदेशीर हक्कांना मान्यता देणे आवश्यक आहे. यात इराणच्या क्षेत्रीय आणि राजकीय हक्कांचा समावेश आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या या हक्कांना धुडकावले असल्याचे ते म्हणाले. या मान्यतेशिवाय शांतता शक्य नाही, असे इराणचे म्हणणे आहे.
दुसरी अट-
युद्धामुळे इराणला झालेल्या आर्थिक आणि लष्करी नुकसानीची भरपाई करणे ही दुसरी अट आहे. हल्ल्यांमुळे इराणच्या शहरांमध्ये विनाश झाला असून, त्याची जबाबदारी अमेरिका आणि इस्रायलवर आहे. पेजेशकियन यांनी सांगितले की, या नुकसानीची भरपाई मिळाल्यास इराण चर्चेसाठी तयार आहे.
तिसरी अट-
भविष्यातील हल्ल्यांविरोधात ठोस आंतरराष्ट्रीय हमी ही तिसरी अट आहे. इराणला विश्वास आहे की, अमेरिका आणि इस्रायल पुन्हा हल्ला करतील, म्हणून संयुक्त राष्ट्र किंवा अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांकडून हमी आवश्यक आहे. या हमीशिवाय युद्ध थांबवणे शक्य नाही, असे राष्ट्रपतींनी स्पष्ट केले आहे.