जागतिक अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांची मोठी घोषणा...
27 वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीनंतर घेतला निवृत्तीचा निर्णय
नवी दिल्ली - 27 वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीनंतर भारतीय वंशाच्या प्रसिद्ध जागतिक अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांनी आपल्या निवृत्तीचा मोठा निर्णय घेतला आहे.
सुनिता विल्यम्स यांची नासामध्ये 1998 मध्ये निवड झाली होती. तेव्हापासून ते आजतागायतपर्यंत त्या नासामध्ये काम करत आहेत. त्यांनी 9 वेळा स्पेसवाक केला असून, त्यासाठी त्यांनी 62 तास आणि 6 मिनिटे वेळ व्यतीत केला आहे. त्यामुळे त्या अंतराळात मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरल्या होत्या.
आपल्या तीन मोहिमांमध्ये एकूण 608 दिवस अंतराळात त्यांनी घालवले आहेत. नासाच्या अंतराळवीरांमध्ये सर्वाधिक काळ अंतराळात राहणाऱ्यांच्या यादीत त्यांचा दुसऱ्या क्रमांक लागतो.
निवृत्तीबाबत बोलताना सुनिता विल्यम्स यांनी म्हटले आहे कि, अंतराळ हे माझे सर्वात आवडते ठिकाण आहे. यावेळी त्यांनी आपल्या 27 वर्षांच्या प्रवासामधील सहकाऱ्यांचे आणि नासाचे आभार मानले आहे.
नासाचे प्रशासक जेरेड आयझॅकमन यांनी सुनिता विल्यम्स यांचे वर्णन 'मानवी अंतराळ मोहिमांमधील मार्गदर्शक' असे केले आहे. तसेच त्यांच्या कार्यामुळे येणाऱ्या पिढ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.
सुनीता विल्यम्स यांनी चंद्रावरील 'आर्टेमिस' तसेच मंगळ मोहिमांसाठी पाया रचण्याचे काम केले आहे. पहिल्या मोहिमेमुळे त्यांनी 9 डिसेंबर 2006 रोजी 'डिस्कव्हरी' या अंतराळ यानातून उड्डाण केले. दुसरी मोहीम (2012) ही 127 दिवसांची होती. यादरम्यान त्यांनी अंतराळ स्थानकातील अमोनिया गळती थांबवण्यासाठी आणि सोलर ॲरेमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी महत्त्वाचे स्पेसवाक केला होता. तिसरी आणि शेवटची मोहीम जून 2024 मध्ये त्या बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेवर गेल्या होत्या. अवघ्या 10 दिवसांची ही मोहीम तांत्रिक अडचणींमुळे साडे नऊ महिने लांबली. त्या मार्च 2025 मध्ये यशस्वीरीत्या पृथ्वीवर परतल्या.