मराठेशाहीचा इतिहासकार हरपला...
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन
कोल्हापूर - ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे. यावेळी त्यांचे वय 85 वर्ष होते.
ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, विचारवंत आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते डॉ. जयसिंगराव पवार यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होती. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या या अकाली निधनामुळे "मराठेशाहीचा इतिहासकार हरपला", अशा भावना व्यक्त होत आहेत.
डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला. डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एम.ए. (सर्वप्रथम) आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन क्षेत्रात विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. महाविद्यालयातील एम.ए.पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 20 क्रमिक पुस्तके लिहिली. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आणि इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयसिंगराव यांच्या संशोधन कारकिर्दीला 1964 मध्ये सुरुवात झाली. या काळात त्यांनी विद्यापीठातील इतिहास विभागात ऐतिहासिक कागदपत्रांच्या संशोधनाचा अनुभव घेतला. त्यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा इत्यादी एकूण 25पेक्षा अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले आहेत.
निरनिराळ्या इतिहास परिषदांमध्ये तसेच संशोधनपर नियतकालिकांत त्यांचे 45हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी अनेक इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान भूषविले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक - सदस्य आणि नंतर तीन वर्षांसाठी अध्यक्ष होते. त्यांनी 1992 मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक-संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. इतिहास संशोधन व त्याद्वारा समाजप्रबोधन हे त्यांचे उद्दिष्ट असून, त्यानुसार संस्थेतर्फे 1200 पानांचा, तीन खंडांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ 2001 मध्ये प्रसिद्ध केला आहे. भारतातील 16 भाषांमध्ये तसेच रशियन, फ्रेंच, इटालियन, जपानी या परकीय भाषांमध्ये अनुवादाचे काम त्यांचे सुरू होते. यांपैकी कन्नड, कोकणी, इंग्लिश, जर्मन, उर्दू व तेलुगू, आणि हिंदी भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. गुजराती व रशियन भाषेतील ग्रंथ प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत. डॉ. जयसिंगराव शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या संस्थेचे संचालक आहेत.