‘माझं शहर, माझी जबाबदारी’ की फक्त दिखावा?...महापालिका कामगारांची दयनीय अवस्था उघड

<p>‘माझं शहर, माझी जबाबदारी’ की फक्त दिखावा?...महापालिका कामगारांची दयनीय अवस्था उघड</p>

कोल्हापूर -  कोल्हापूर महापालिकेतर्फे ‘माझं शहर, माझी जबाबदारी’ या घोषवाक्याखाली नुकतीच महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शहर स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमात मात्र वास्तवाचे विदारक चित्र समोर आले. सोयी-सुविधा आणि आवश्यक साधनांच्या अभावामुळे स्वच्छता कामगारांची दयनीय अवस्था पाहायला मिळाली.

मोहीमेच्या दिवशी अनेक कामगार पायात बूट नसताना, हातात हातमोजे नसताना कचरा आणि घाण साफ करताना दिसले. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या या कामासाठी मूलभूत संरक्षण साहित्यसुद्धा उपलब्ध नसल्याचे चित्र होते.

दुसरीकडे महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि इतर पदाधिकारी मात्र हातमोजे घालून स्वच्छता करताना दिसले. छायाचित्रांमध्ये आणि प्रसिद्धीमाध्यमांसमोर स्वच्छतेचा संदेश देणारे हेच अधिकारी दैनंदिन स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

▪️दिखाव्यापुरती स्वच्छता?...
एक दिवसासाठी प्रतीकात्मक स्वच्छता करताना जर पदाधिकाऱ्यांना हातमोजे आणि सुरक्षा साहित्य आवश्यक वाटत असेल, तर दररोज कचरा, सांडपाणी, घाण आणि धोकादायक वस्तूंमध्ये काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांना महापालिकेकडून आवश्यक बूट, हातमोजे, मास्क आणि इतर सुरक्षा साधने का पुरवली जात नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असताना प्रशासनाने केवळ घोषणाबाजी आणि फोटोसेशनपुरते उपक्रम मर्यादित ठेवले आहेत का, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

▪️कामगारांच्या हक्कांचे काय?...
स्वच्छता ही शहराच्या आरोग्याशी निगडित अत्यावश्यक सेवा आहे. या सेवेचा कणा असलेल्या कामगारांनाच मूलभूत सुविधा न देणे ही गंभीर बाब आहे. नियमित सुरक्षा साहित्य, आरोग्य विमा, वैद्यकीय तपासणी आणि सुरक्षित कामाच्या अटी या त्यांच्या मूलभूत गरजा आहेत.

महापालिकेच्या महास्वच्छता मोहिमेने शहर स्वच्छतेचा संदेश दिला असेल; मात्र त्याचवेळी कामगारांच्या स्थितीचे अस्वच्छ वास्तवही उघड केले आहे.

महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि संबंधित अधिकारी या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून तातडीने उपाययोजना करणार का? की ‘माझं शहर, माझी जबाबदारी’ ही घोषणा फक्त बॅनरपुरतीच राहणार? हा प्रश्न समोर आलाय.