कागल ग्रामीण रुग्णालयातील ‘या’ डॉक्टरची तडकाफडकी गडहिंग्लजला बदली

<p>कागल ग्रामीण रुग्णालयातील ‘या’ डॉक्टरची तडकाफडकी गडहिंग्लजला बदली</p>

कोल्हापूर - कागल ग्रामीण रुग्णालयात शासनाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या असून याठिकाणी सुमारे ५० ते ६० कर्मचारी सेवेत आहेत. त्यापैकी २० कर्मचारी करार तत्वावर कार्यरत आहेत. रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक आणि सहाय्यक अधीक्षक अशी प्रशासकीय व्यवस्था असून दररोज १५० ते २०० रुग्ण उपचारासाठी येत असतात.

शनिवारी रात्री प्रसूती वेदना सुरू झाल्याने कागलमधील एक महिला ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. तेव्हा रुग्णालयात असलेले डॉक्टर दिगंबर टोणपे यांनी येथे सोय होणार नसल्याचे सांगत महिलेला कोल्हापूरातील सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र याबाबत लेखी अहवाल देण्याची मागणी नातेवाईकांनी केली असता डॉक्टरांनी तोंडी सूचना दिल्याने वाद निर्माण झाला.

त्यानंतर रुग्णालयातील यापूर्वीच्या डॉक्टरांना बोलावून महिलेची तपासणी करण्यात आली. त्यांनी महिला सुखरूप असून घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले. या घटनेची माहिती मिळताच काही संघटनांचे प्रतिनिधी रुग्णालयात दाखल झाले. जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी रुग्णालयात येऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयाच्या अधीक्षकांना रात्रीच बोलावून घेत संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अधीक्षिका डॉ. सरिता थोरात यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टर दिगंबर टोणपे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि त्यांचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्याची कार्यवाही सुरू केल्याची माहिती दिली. तसेच प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही अधीक्षकांनी दिली.

दरम्यान, डॉक्टर दिगंबर टोणपे यांची तात्काळ गडहिंग्लजला बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉक्टर जीवन पाटील हे रुजू झाले आहेत.