घरफाळा थकबाकीदारांकडून अवघ्या चार दिवसात सहा कोटीहून अधिक रक्कम जमा...
कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने २६ मार्च ते ३१ मार्च दरम्यान घरफाळा थकबाकीच्या दंडावर ८० टक्के सवलत देण्यात आली होती. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक लाख ६३ हजार एकूण मिळकत धारक आहेत. त्यातील ५३ हजारांहून अधिक थकबाकीदार आहेत. आज आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असल्याने महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली होती.
गांधी मैदान, छत्रपती शिवाजी मार्केट, राजारामपुरी, कावळा नाका, कसबा बावडा, महानगरपालिका मुख्य इमारत अशा सहा ठिकाणच्या नागरी सुविधा केंद्रावर नागरिकांनी कर भरणा केला. मागील सहा दिवसात ४ हजार ६२५ थकबाकीदारांनी दंड व्याज सवलत योजनेचा लाभ घेतला. या माध्यमातून ३१ मार्च दुपारपर्यंत सहा कोटी तीन लाख २९ हजारांहून अधिक रक्कम महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा झालीय. फक्त आजच्या शेवटच्या दिवशी दुपारी दोन पर्यंत १ कोटी १४ लाख रुपयांचा घरफाळा भरण्यात आला होता. यावर्षी एक एप्रिल ते एकतीस मार्च 2027 दरम्यान सत्तर कोटींहून अधिक रक्कम जमा होईल, असा विश्वास करनिर्धारक सुधाकर चल्लावाड यांनी व्यक्त केला आहे.
महापालिकेने गेल्या वर्षी एकूण तीन महिने अशा पद्धतीने कर सवलत योजना राबवली होती. यावर्षी सहा दिवसच ही योजना देण्यात आली. यात बँकांना गुरुवार २६ आणि सोमवार ३० मार्च असे दोन दिवस सोडून इतर वेळी सुट्टी होती. त्यामुळे नागरिकांना अनेक मर्यादा आल्या अन्यथा अजून घरफाळा जमा झाला असता. फक्त घरफाळाच नाही तर आयकर विभाग, जीएसटी अशा सर्वच विभागांना बँका बंद असल्याचा फटका बसला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.