कोल्हापूर महानगरपालिकेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर...
कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेचा सन २०२५-२६ चा सुधारीत आणि २०२६-२७ चा नवीन अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. जवळपास १ हजार ४९७ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून विकास कामे, महसूल वाढ आणि नागरिकांसाठी आधुनिक सुविधा यावर विशेष भर देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पानुसार सन २०२६-२७ साठी महसुली जमा सुमारे ७५४ कोटी रुपये अपेक्षित आहे, तर खर्चही जवळपास त्याच पातळीवर ठेवण्यात आला आहे. भांडवली कामांसाठी २६८ कोटी रुपये, तर विशेष प्रकल्पांसाठी ४१८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीसह एकूण अर्थसंकल्पाचा आकार तब्बल १ हजार ४९७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
या अर्थसंकल्पात प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यावर भर, महसूल वाढविण्याचे उद्दिष्ट, ऑनलाईन सेवांचा विस्तार, स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन सुधारणा, तसेच महिला, बालक आणि दिव्यांग कल्याण योजनांचा समावेश करण्यात आला आहे. महानगरपालिकेने केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध प्रकल्पांना प्राधान्य देत हा अर्थसंकल्प तयार केला आहे.
महानगरपालिकेने सन २०२६-२७ साठी घरफाळा करातून ११० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी करजाळ्यात नसलेल्या मिळकती शोधून त्यांना करप्रणालीमध्ये आणण्यावर भर दिला जाणार आहे. एकूणच, महसूल वाढ आणि विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसून येतो आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचा हा अर्थसंकल्प शहराच्या विकासाला चालना देणारा ठरेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.