तमाशा मंडळातील कलावंतांना मारहाण प्रकरणाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालवण्याची मागणी

<p>तमाशा मंडळातील कलावंतांना मारहाण प्रकरणाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालवण्याची मागणी</p>

कोल्हापूर - राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या कैलासवासी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या तमाशा मंडळातील कलाकार बुधवारी, एक एप्रिलला कार्यक्रम आटोपून अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वरळी पठार परिसरात आले होते. यावेळी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या आठ ते दहा लोकांनी तमाशा कलावंतांचे वाहन अडवले. यावेळी त्यांनी वाहनातील महिला कलाकारांना बेदम मारहाण केली. यानंतर कलाकारांकडील दोन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचे कलाकार महासंघाचे अध्यक्ष अनिल मोरे यांनी सांगितले. या प्रकरणी तमाशा कलावंत कैलास सावंत यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून महिला तमाशा कलावंतांना मारहाण करणाऱ्या दहा जणांना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालवून दोषींना कठोर शासन करावे, अशी मागणी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मोरे यांनी केली आहे.

या पत्रकार बैठकीला बाळासाहेब गारे, देवदास भंडारे, प्रभादेवी पाटील, तुकाराम लोहार, प्रिया गोंजारी, पंडित बुचडे, जयश्री मगदूम आदी उपस्थित होते.