पश्चिम महाराष्ट्रातील पहिला AI लघुपट महोत्सव वारणानगरात
वारणानगर : कै. विलासराव कोरे यांच्या ३१ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रज्ञान कला अकादमी, वारणानगर यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील पहिला AI लघुपट महोत्सव रविवारी (दि. ५) आयोजित करण्यात आला आहे.
सायंकाळी ६ ते ९ या वेळेत होणाऱ्या या महोत्सवात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या लघुपटांचे प्रदर्शन होणार आहे. कोल्हापूरचे दिग्दर्शक करण चव्हाण यांच्या लघुपटांचे सादरीकरण यावेळी करण्यात येणार असून, AI तंत्रज्ञानाचे चित्रपट निर्मितीमधील भविष्यातील स्थान या विषयावर ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान, कोल्हापूरचे युवा दिग्दर्शक मयूर कुलकर्णी हे नवोदित निर्माते व दिग्दर्शकांना “चित्रपट निर्मितीमधील ग्लॅमर व वास्तव” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या “स्वीट मून” या लघुपटास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळून २० पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
या अनोख्या महोत्सवाचा लाभ सिनेप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन प्रज्ञान कला अकादमीचे अध्यक्ष रमेश चौगुले व सचिव निलेश आवटी यांनी केले आहे.