नगराध्यक्षपद आरक्षण सोडतीनंतर शिरोळ तालुक्यात 'कहीं खुशी, कही गम'

कोल्हापूर - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोडत पध्दतीने निश्चित करण्यात आले. यामध्ये कुरुंदवाडचे नगराध्यक्षपद महिला, शिरोळचे अनुसूचित जाती महिला, तर जयसिंगपूरचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
कुरुंदवाड मध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित झाल्यानंतर काँग्रेसचे नेते विजय पाटील यांच्या समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजी करत पेढे वाटून जल्लोष केला. महिला आरक्षणामुळे योगिनी पाटील, माजी नगराध्यक्षा मनिषा डांगे यांची नावे नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. शिरोळ नगरपालिकेसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण निश्चित झाल्याने इथल्या प्रस्थापितांना आता या प्रवर्गातील मातब्बर उमेदवार शोधावे लागणार आहेत. जयसिंगपूरचे नगराध्यक्षपद खुले झाल्याने माजी नगराध्यक्ष संजय पाटील - यड्रावकर हे स्वतः मैदानात उतरणार की कार्यकर्त्याला संधी देणार हे पहावे लागणार आहे. एकंदरीत नगराध्यक्षपद आरक्षणानंतर शिरोळ तालुक्यात ‘कहीं खुशी कही गम’ अशी स्थिती आहे.