इचलकरंजीतील नगरसेविका स्नेहल रावळ यांच्या निवडीविरोधात दिवाणी न्यायालयात याचिका...

<p>इचलकरंजीतील नगरसेविका स्नेहल रावळ यांच्या निवडीविरोधात दिवाणी न्यायालयात याचिका...</p>

इचलकरंजी – महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ क मधून निवडून आलेल्या स्नेहल दिपक रावळ यांच्या निवडीविरोधात माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याची सुनावणी १८ फेब्रुवारीला ठेवण्यात आली, असल्याची माहिती मोरबाळे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. स्नेहल रावळ यांनी निवडणूक कार्यालयाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्तेबाबत अपुरी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली असल्याचा आरोप प्रकाश मोरबाळे यांनी केला आहे.

रावळ यांचे सासरे कै. अशोक रावळ यांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या मंजूर रेखांकनातील खुल्या जागेवर अनाधिकृत बांधकाम केले असून या जागेसंबंधी कै. रावळ आणि त्यांच्या भावांनी इचलकरंजी नगरपरिषद असताना नगरपरिषदे विरुद्ध दावा दाखल केला होता. मात्र हा दावा ऑगस्ट २०१८ मध्ये न्यायालयाने खर्चासह नामंजूर केला आहे. त्यानंतर अशोक रावळ यांचे फेब्रुवारी २०२५ मध्ये निधन झाले असून त्यांचे कायदेशीर वारसदार म्हणून दिपक अशोक रावळ यांचे नाव लावण्यात आले आहे. सध्या याच जागेवर रावळ कुटुंब वास्तव्याला आहेत. मात्र ही माहिती निवडणूक विभागाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात लपवण्यात आली आहे. दरम्यान, खुल्या भूखंडावर विनापरवाना बांधकाम करून महानगरपालिकेचे नुकसान केल्याप्रकरणी मोरबाळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि स्नेहल रावळ यांना प्रतिवादी करत दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आले असून न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.