इचलकरंजी महापौर पदासाठीची नावे बंद लिफाफ्यातून मुख्यमंत्र्यांकडे रवाना...
उद्या होणार फैसला
इचलकरंजी - महानगरपालिकेत महायुतीने ४७ जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये भाजपाने ४३ जागा, शिंदेच्या सेनेला ३ जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केवळ एक जागा मिळवली आहेत. काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या शिव - शाहू आघाडीला १७ जागा मिळाल्या आहेत. इचलकरंजीचे महापौर पद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. इचलकरंजी शहराचा पहिला महापौर होण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्याने नेत्यांसमोर निवडीचा पेच निर्माण झाला आहे.
आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन महापौर पदाची नावे बंद लिफाफ्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर मंत्री चंद्रकांत पाटील इचलकरंजीत सहा फेब्रुवारीला म्हणजे उद्या महापौर पदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार आहेत.
या बंद लिफाफ्यात उदय धातुंडे, अभिषेक वाळवेकर, राजू बोंद्रे, तानाजी पवार, प्रदीप धोत्रे, रूपा बुगड, धृवती दळवाई यांची नावे असल्याची माहिती समोर येत आहे. यातील कुणाच्या हातात महानगरपालिकेच्या चाव्या जाणार, कोण पहिला महापौर होणार हे उद्या स्पष्ट होणार आहे. तसेच उपमहापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पक्षश्रेष्ठींनी महापौर पदाच्या उमेदवाराचे नाव घोषित केल्यानंतर सात फेब्रुवारीला आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे महापौर आणि उपमहापौर पदाचा अर्ज भरण्यात येणार आहे.