कणेरीवाडीत काँग्रेसची विजयी संकल्प सभा 

आपल्या मागे जनतेची मोठी फौज उभीय : ऋतुराज पाटील

<p>कणेरीवाडीत काँग्रेसची विजयी संकल्प सभा </p>

कोल्हापूर – सत्ताधाऱ्यांकडे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि सर्वकाही असलं तरी आपल्यामागे जनतेची मोठी फौज उभी असल्याचे वक्तव्य माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. कणेरीवाडीतील काँग्रेसच्या विजयी संकल्प सभेत ते बोलत होते.

गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुदर्शन खोत आणि पंचायत समितीचे उमेदवार संदीप पाटील यांच्या प्रचारासाठी कणेरीवाडीत विजयी सभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेला पंचक्रोशीतील महिला आणि तरुणांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, या निवडणुकीत सक्षम, अनुभवी आणि जनतेशी थेट नाळ असलेले उमेदवार आवश्यक असल्याचे सांगितले. सुदर्शन खोत आणि संदीप पाटील हे दोघेही विकासाभिमुख, स्वच्छ प्रतिमेचे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने झटणारे उमेदवार असल्याचे त्यांनी नमूद केले.

नगरसेवक राजेश लाटकर यांनी, भाजप सरकारच्या गेल्या ११ वर्षांच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी आपल्या १५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील कामांचा आढावा घेतला. शेवटच्या दोन दिवसांत विरोधक गैरसमज निर्माण करतील, त्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेसचे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार सुदर्शन खोत यांनी, गेल्या अनेक वर्षांत जनतेच्या विश्वासावरच आपली वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहून प्रत्येक गावाच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला.

पंचायत समितीचे उमेदवार संदीप पाटील यांनी, गेल्या २५ वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केल्याचे सांगितले. वेदवती मोहिते यांनी महिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली. महागाई, गॅस सिलिंडर, पेट्रोल, सोन्याचे वाढते दर याचा सर्वाधिक फटका महिलांनाच बसतोय. लाडकी बहीण योजनेतील दीड हजार रुपये हा कायमस्वरूपी उपाय नसून महिलांना रोजगार, सुरक्षितता आणि सन्मानाचे आयुष्य हवंय असंही त्यांनी सांगितले.

यावेळी सागर पाटील यांनी, काँग्रेस नेतृत्वामुळेच शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सामान्यांना सुविधा मिळाल्याचे सांगितले. डॉक्टर विशाल पाटील यांनी, महागाई, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाच्या मुद्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडले. प्रवीण चव्हाण, विनोद लाड यांनीही भाजप सरकारवर टीका केली. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सरिता खोत, कणेरीचे सरपंच निशांत पाटील, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, कणेरीवाडीच्या सरपंच शामल कदम, उपसरपंच सीमा खोत, वैभवी जरग यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.