शिवाजी विद्यापीठाची अधिसभा तब्बल १२ तास चालली...
शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत १०५ ठरावांपैकी ३३ मान्य तर ७२ अमान्य...
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाची अधिसभेची बैठक काल शनिवारी तब्बल १२ तास चालली. या अधिसभेत एकूण १०५ ठराव मांडण्यात आले. यातील ३३ मान्य करण्यात आले तर ७२ अमान्य करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते, तर प्र. कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव, कुलसचिव डॉक्टर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला कुलगुरू डॉ. गोसावी यांनी, १५ मार्च २०२५ ते १९ डिसेंबर २०२५ पर्यंतचा आढावा घेतला. त्यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. सदस्या श्वेता परुळेकर यांनी, विद्यापीठाकडे पहिल्या महिला प्र. कुलगुरू ज्योती जाधव यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन केलं. चर्चेवेळी अॅडव्होकेट अभिषेक मिठारी यांनी आधीच्या अधिसभेतील मंजूर ठरावांची अंमलबजावणी का करण्यात आली नाही ? असा सवाल उपस्थित करत याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी केली.
त्याचबरोबर दोन बैठकांमधील अंतर आठ महिन्यांपेक्षा अधिक असू नये, असा नियम आहे. मात्र साडेनऊ महिन्यांनी ही बैठक होत असल्याने ही बैठकच बेकायदेशीर असल्याचा आरोप मिठारी यांनी केला. डॉक्टर निवासराव वरेकर यांनी सेट पेपर फुटी प्रकरणी विद्यापीठाची भूमिका जाणून घेण्यासाठी स्थगन प्रस्ताव सादर केला. मात्र याबाबत पुढील चर्चेत ठराव येणार असल्यानेअध्यक्षांनी हा प्रस्ताव नाकारला.
या चर्चेत प्रताप पाटील, श्वेता परुळेकर, विष्णू खाडे, श्रीनिवास गायकवाड, डॉक्टर घनश्याम दीक्षित, सुजित शेळके, मनोज गुजर आदी सदस्यांनी सहभाग घेतला. या सभेला आमदार सुधीर गाडगीळ, डी. वाय. पी. ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, डॉ. मंजिरी मोरे, डॉक्टर डी. एन. पाटील, बी. एस. सावंत, ज्ञानदेव काळे आदी उपस्थित होते.