वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी ‘महाराष्ट्र केसरी’ विष्णू जोशीलकर यांचे ग्रंथदान
मांडेदुर्ग : श्री हनुमान विद्यालय, मांडेदुर्ग येथे महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी एक प्रेरणादायी ग्रंथदान कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी या उद्देशाने जोशीलकर यांनी विद्यालयाला विविध प्रकारची पुस्तके भेट दिली.
यावेळी विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक पी. टी. वडर यांनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला. मनोगत व्यक्त करताना जोशीलकर म्हणाले, “मोबाईलच्या वाढत्या आकर्षणाच्या काळात वाचनसंस्कृती जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. पुस्तके ही केवळ ज्ञानाचे भांडार नसून व्यक्तिमत्व घडविणारी अमूल्य संपत्ती आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिवापर टाळून नियमित वाचनाची सवय लावण्याचे आवाहनही केले.
कार्यक्रमाला जोशीलकर यांचे सहकारी, विविध अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ अध्यापक एस. एल. बेळगावकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अध्यापक एम. एम. कांबळे यांनी मानले.
यावेळी शालेय समिती सदस्य मारुती पवार, शिवाजी कृष्ण पाटील, दयानंद भोगण, व्ही. जे. पाटील तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.