कोल्हापूरमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणारी टोळी गजाआड!

<p>कोल्हापूरमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणारी टोळी गजाआड!</p>

कोल्हापूर - कोल्हापूर शहरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना टार्गेट करून, चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. अटकेतील मुख्य आरोपीसह दोन अल्पवयीन साथीदारांनी मिळून तब्बल 4 लाख 60 हजार किंमतीचा लुटलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय.

गेल्या काही दिवसापासून सुनसान परिसरात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने हिसकावले जात होते. एका आठवड्यात पाचगाव, गिरगाव, आर.के.नगर, मोरेवाडी, शांतिनिकेतन परिसरात चार वेगवेगळ्या ठिकाणी चोरीचे प्रकार घडले होते. आरोपी मोटरसायकल वरून येऊन महिलांना चाकूचा धाक दाखवून महिलांच्या गळयातील सोन्याचे दागीने जबरदस्तीने हिसकावत असत. गुन्हयांचे गांभीर्य ओळखुन कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना या गुन्हयांचा समांतर तपास करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक स्थापन केलं.परिसरातील शंभर सीसीटीव्ही फुटेज तपासले. अनेक साक्षीदारांची चौकशी केली. हॉकी स्टेडियम परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींची ओळख पटली. संशयित आरोपी श्रेयस खाडे व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी चैनीसाठी गुन्हा केल्याचे मान्य केले. गिरगाव घाट, खडीचा गणपती व शांतिनिकेतन शाळेजवळ महिलांना लुटल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा सुमारे चार लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार सुरेश पाटील, हिंदुराव केसरे, गजानन गुरव, रुपेश माने, रोहित मर्दाने, संतोष बर्गे, अमित सर्जे, वसंत पिंगळे, संजय हूंबे, प्रवीण पाटील, करवीर पोलीस ठाण्यातील अंमलदार विजय तळसकर, सुजय दावणे, प्रकाश कांबळे आणि सहकार्यानी मिळून केलीय.