शालेय पोषण आहार गैरव्यवहार प्रकरणी आजच शो कॉज नोटीस काढणार
आठ दिवसांत कारवाई करण्याचं शिक्षक उपसंचालकां आश्वासन

कोल्हापूर - शहरातील शालेय पोषण आहार गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दोन जुलैला लेखी आदेश दिले होते. यासाठी तातडीनं चौकशी समिती नेमून चौकशीचा अहवाल पाठवावा असं त्यांनी आदेशात म्हटलं होतं. त्यानंतर शिक्षण निरिक्षक समरजित पाटील आणि सहायक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी तातडीनं चौकशी समिती नेमून चौकशी करण्याचं आश्वासन कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीला दिलं होतं. मात्र, एक महिन्याचा कालावधी उलटला तरी या प्रकरणाची चौकशी झाली नाही. त्यामुळं दोषींना पाठीशी घालण्यासाठी शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या आदेशाला शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप कृती समितीनं केलाय. संबंधित चौकशी समितीवर आणि चौकशी समितीच्या अध्यक्षा असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कृती समितीनं कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्याकडं केलीय.
शिक्षण उपसंचालक चोथे यांनी संबंधितांना आजच शो कॉज नोटीस काढणार असल्याचं सांगून, आठ दिवसांत दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही कृती समितीला दिलीय.. यावेळी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीचे रमेश मोरे, राजाभाऊ मालेकर, सदानंद सुर्वे, बाबा वाघापुरकर, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकाश आमते, अमृत शिंदे, केशव लोखंडे, रविंद्र कांबळे, अण्णाप्पा खमलेहटी, महेश जाधव, राजेश सरक आदी उपस्थित होते.