महात्मा फुले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार; मांडेदुर्ग विद्यालयाचा प्रेरणादायी उपक्रम

<p>महात्मा फुले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार; मांडेदुर्ग विद्यालयाचा प्रेरणादायी उपक्रम</p>

चंदगड -  खेडूत शिक्षण मंडळ संचलित श्री हनुमान विद्यालय मांडेदुर्ग येथे शनिवार  11 एप्रिल 2026 रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विविध शासकीय विभागांमध्ये निवड झालेल्या शाळेच्या माजी चार सुपुत्र - सुकन्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.टी. वडर हे होते. 

प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विविध मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण विभागामध्ये निवड झाल्याबद्दल विद्यालयाची माजी विद्यार्थ्यांनी कु. रविना रणबा कडगावकर, भारतीय टपाल विभागात निवड झाल्याबद्दल विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. पितांबरी संभाजी चिरमुरकर, 106 बटालियन भारतीय सशस्त्र सेनेमध्ये निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे माजी विद्यार्थी महादेव पुंडलिक पाटील व लखन रमेश पाटील यांचा शालेय समितीच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

"या विद्यालयांमध्येच घडलो, आई-वडिलांची प्रेरणा मिळाली, सर्व शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन मिळाले, या सर्वातून आम्ही या पदापर्यंत येऊन पोहोचलो. अजूनही आम्हाला बरंच काही करायचं आहे. शाळेतील शिक्षकांचा व आई-वडिलांचा सदैव आमच्या पाठीशी आशीर्वाद आहे, त्यामुळे आम्ही जिद्दीने, आत्मविश्वासाने येथून पुढेही नवनवीन पदे मिळवणार" अशा भावना सत्काराला उत्तर देताना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. 

विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. टी. वडर म्हणाले, "माजी विद्यार्थ्यांनी जे यश मिळवलेला आहे हे खऱ्या अर्थाने जे स्वप्न महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी बघितलं होतं ते साकार झालं. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास जिद्द आणि चिकाटी असेल तर ते सर्वोच्च पदापर्यंत जाऊन पोहोचतात, त्याचे फलित म्हणजे हे आपले माजी विद्यार्थी. यश मिळवण्यासाठी कोणतीही परिस्थिती, आर्थिक अडचण, सामाजिक अडचण कारणीभूत ठरत नाही". हे सांगत अनेक उदाहरणांचा सांगड घालून यावेळी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केलं. 

यावेळी विविध पदापर्यंत पोहोचलेल्या माजी विद्यार्थ्यांचे पालक, माता पालक, शालेय समिती सदस्य शिवाजी कृष्णा पाटील, दयानंद मारुती भोगण, नाना डसके,एस.एल. बेळगावकर, एम. एम. कांबळे, एस. व्ही. जाधव यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.