डी. वाय. पाटील विदयापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील शिवजीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठात आजी - माजी विद्यार्थी कृती समितीच्यावतीने विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात शिव महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्षा सरोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांना शिव जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यानंतर डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या हस्ते भरत लाटकर आणि अनिल लवेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वीसहून अधिक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना सरोज पाटील यांनी, महाराष्ट्राच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना शाहू, फुले, आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आज भोंदूबाबांच्या अंधश्रद्धेला बळी पडत आहे, अशी खंत व्यक्त केली. सध्या मानवाला आभासी जगाने जखडले. मोबाईलच्या व्यसनापासून मुलांना दूर ठेवा, असे आवाहन पाटील यांनी केले.
भरत लाटकर यांनी, राष्ट्रसेवा दलाच्या कार्यातून देश सेवेची प्रेरणा मिळते. तुम्हाला नवीन देश निर्माण करायचा आहे, यासाठी सर्वांनी देशासाठी एक तास द्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए. के. गुप्ता, डी वाय पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, नगरसेवक राजेश लाटकर, आदिल फरास, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, प्राध्यापक रघुनाथ ढमकले, पर्यटन विभागाचे उपसचिव विजय पोवार, डॉक्टर सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉक्टर सरदार जाधव, शिवाजी विद्यापीठ आजी माजी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कोडोलीकर, उपाध्यक्ष शुभम शिरहट्टी, मंजित माने, योगिता कोडोलीकर, निलेश बनसोडे, विश्वजीत वाडकर, नितेश गणेशाचार्य, अक्षय मोरे, डॉक्टर कपिल राजहंस यांच्यासह आजी - माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.