लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरचे विद्यार्थी आता करणार हायटेक लर्निंग

महाराष्ट्रातील महानगरपालिकेची पहिलीच हायटेक शाळा

<p>लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरचे विद्यार्थी आता करणार हायटेक लर्निंग</p>

कोल्हापूर – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्यावतीने शालेय गुणवत्तेच्या आधारावर लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर शाळेस आयडियल सेंटरचे मानांकन मिळाले आहे. त्यामुळे अत्याधुनिक लॅब असणारी कोल्हापूर शहरातील ही पहिलीच शाळा ठरली आहे. 
महापालिकेचे उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते या अत्याधुनिक लॅबचे उद्घाटन झाले आहे. यावेळी प्रभागाच्या नगरसेविका सुषमा जरग, नगरसेवक दुर्वास बापू कदम, विजयसिंह खाडे पाटील, ॲड. मानसी लोळगे आदि उपस्थित होते.
श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर ही शाळा शिक्षण, संस्कार आणि गुणवत्ता यांचा सुंदर संगम आहे. येत्या गुढीपाडव्याला शाळेला 31 वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रवासामध्ये शाळेने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. आजपर्यंत शाळेचे 400 पेक्षा अधिक विद्यार्थी  शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले आहेत. तर शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थी राज्यात प्रथम आले आहेत. सर्वाधिक पटसंख्येची महाराष्ट्रातील शाळा म्हणून या शाळेने वेगळा नावलौकिक मिळविला आहे.  विद्यार्थ्यांना महत्वाच्या संकल्पना सहज व मूर्त स्वरुपात समजावून सांगण्यासाठी या लॅबचा वापर होणार आहे. इंटरॅक्टिव्ह बोर्ड, स्टुडन्ट ई-पोडियम ,टीचर्स ई-पोडियम, DLP अंतर्गत सर्व इयत्तांचा अभ्यासक्रम आयडियल सेंटरमध्ये उपलब्ध आहे. 
        या Futuristic classroom मध्ये विद्यार्थ्यांसाठी एकूण 24 स्वतंत्र हायटेक टचस्क्रीन प्लॅटफॉर्म आणि शिक्षकांसाठी स्वतंत्र कंट्रोलिंग टचस्क्रीन प्लॅटफॉर्म सहित इंटरऍक्टिव्ह बोर्ड , उपलब्ध करून दिले आहेत. एकूणच हायटेक बैठकव्यवस्थेसह विद्यार्थी आता हायटेक लर्निंग करणार आहेत. याद्वारे विद्यार्थी कोणत्याही असाइनमेंट किंवा पेपर देखील सहज सोडवू शकणार आहेत. 
           या प्रसंगी संतोष जरग, प्रशांत जरग, वैभवी जरग, अर्जुन जरग, सतीश लोळगे, विमल गवळी, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार, शाळेच्या मुख्याध्यापिका नीता ठोंबरे, उपमुख्याध्यापक शिवाजी पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर पाटील, सदस्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.