इचलकरंजीतील गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालयाचे काम रखडल्याने शिवशाहू आघाडी आक्रमक

<p>इचलकरंजीतील गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालयाचे काम रखडल्याने शिवशाहू आघाडी आक्रमक</p>

इचलकरंजी - शहरातील गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालयाच्या नव्या इमारतीच्या कामासाठी शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कामाला सुरुवात झाली मात्र दीड वर्षांपासून काम रखडल्याने शहरातील अनेक विद्यार्थी आणि अभ्यासकांना दर्जेदार वाचनालयाच्या सुविधांपासून वंचित रहावे लागतं आहे. वाचनालयाच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळत नसल्याने शिवशाहू विकास आघाडी आक्रमक झाली आहे. त्यांच्याकडून आमदार राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

 शहराच्या शैक्षणिक अस्मितेशी निगडित असलेल्या या महत्त्वाच्या प्रकल्पाकडे दुर्लक्ष का केलं जातंय, असा सवाल शिवशाहू विकास आघाडीच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या सुविधांसाठी आणि महापालिकेच्या भाड्याच्या वाहनांवर लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या वाचनालयाच्या कामाला प्राधान्य दिले जात नाही. वाचनालयाचे हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे की महापालिकेकडे, याबाबत संभ्रम असला तरी शहरातील विद्यार्थ्यांना वाचनालयाच्या सुविधेपासून वंचित ठेवणे आम्हाला मान्य नसल्याचे शिवशाहू विकास आघाडीचे गटनेते उदयसिंह पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

वाचनालयाच्या कामाला तातडीने गती देऊन आधुनिक डिजिटल अभ्यासिका आणि सुसज्ज वाचनालय उभारण्यात यावे, अशी मागणी शिवाशाहू विकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. प्रशासनाकडे आम्ही पाठपुरावा करणार असून प्रशासनाने जर दुर्लक्ष केले तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही शिवशाहू आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील इतर विकासकामांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना वाचनालयासारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.