शिवाजी विद्यापीठ नोकरी महामेळावा : नऊ हजार जागांसाठी सतरा हजार उमेदवारांची उपस्थिती...

<p>शिवाजी विद्यापीठ नोकरी महामेळावा : नऊ हजार जागांसाठी सतरा हजार उमेदवारांची उपस्थिती...</p>

कोल्हापूर -  शिवाजी विद्यापीठात राज्यस्तरीय नोकरी महामेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती रोजगार कक्ष, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊडेशन आणि विद्यापीठ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा १२५ कंपन्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या. नऊ हजार जागांसाठी जवळपास सतरा हजार इच्छुक उमेदवार आले होते. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या महामेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव होत्या  तर खासदार धैर्यशील माने, माजी परराष्ट्र सचिव डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी, महाराष्ट्राच्या औद्योगिक वृद्धीसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची आणि कुशल तसेच प्रशिक्षित मनुष्यबळ विकासासाठी शासनातर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. उद्योगांना आवश्यक कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याचे उद्दिष्ट शासन बाळगून आहे. राज्यातील प्रत्येक विद्यापीठाने दोन एकर जागा दिल्यास त्याठिकाणी शासनातर्फे सुसज्ज आणि अद्यावत कौशल्य विकास केंद्र उभारता येईल असे सांगितले. यासह कोल्हापूरमध्ये सहा महिन्यांत आयटी पार्क स्थापन होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी, देशात साधारणतः दहा कोटी बेरोजगार आहेत तर दुसरीकडे कोट्यवधी रोजगारही उपलब्ध आहेत. या दोहोंची सांगड घालत देशातील गुणवत्त युवा पिढीला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगितले. या प्रसंगी खासदार धैर्यशील माने, विद्यापीठ विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ. सुभाष कोंबडे, कुलसचिव डॉ. विलास शिंदे  यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.