उद्यापासून १० वी ची परीक्षा : सीसीटीव्ही वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई – १२ वीच्या परीक्षेत झालेल्या कॉपीच्या प्रकारामुळे १० वीच्या परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही यंत्रणेच्या वापराबाबत विभागीय मंडळाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
उद्यापासून राज्यातील १० वीच्या परीक्षा सुरु होत आहे. त्या अनुषंगाने परीक्षा केंद्रांमध्ये पारदर्शकता, शिस्त आणि गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी राज्य व विभागीय मंडळाने सीसीटीव्हीमधील रेकॉर्डिंग जतन करण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत. सर्व परीक्षा केंद्र शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि केंद्र संचालकांसाठी सीसीटीव्ही यंत्रणेच्या वापराबाबत तसेच रेकॉर्डिंग जतन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे पालन न झाल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर थेट कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
परीक्षा केंद्रांवर केवळ कॅमेरे लावणे पुरेसे नसून, प्रत्येक पेपरच्या दिवशी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी आणि परीक्षा संपल्यानंतरही रेकॉर्डिंग सुरू ठेवणे बंधनकारक राहील. परीक्षा कालावधीत पेपर सुरू होण्यापूर्वी दररोज तसेच वेळोवेळी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत की नाहीत आणि रेकॉर्डिंग होत आहे की नाही, याबाबत खात्री करण्यासाठी केंद्र संचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत.