निकोप समाजासाठी माध्यमांकडून जबाबदार लैंगिक वृत्तांकन अपेक्षित : समुपदेशक अबोली

<p>निकोप समाजासाठी माध्यमांकडून जबाबदार लैंगिक वृत्तांकन अपेक्षित : समुपदेशक अबोली</p>

कोल्हापूर -  शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात 'लैंगिकता जबाबदार वार्ताकन' या विषयावर कार्यशाळा पार पडली. किर्लोस्कर ऑइल इंजिन, प्रयास आणि मानस या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात पुण्यातील मानसशास्त्र समुपदेशक अबोली यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना त्यांनी, जन्म झाल्यापासून लैंगिकता सुरू होते नंतर वयापरत्वे त्यामध्ये बदल होत जातात असे सांगितले. लैंगिकतेचा प्रवास प्रौढपणाच्या आधीपासूनचा असतो. शरीरात घडणाऱ्या बदलांबाबत पालकांकडून पाल्यांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे, असा सल्ला त्यांनी दिला. प्रत्येक व्यक्तीला आनंददायी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्याचा हक्क आहे. त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. त्याचबरोबर लैंगिकतेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑडिओ-व्हिडिओ प्रसारित करणे गरजेचे आहे. माध्यमांनी समाजातील महत्वाचा घटक म्हणून लैंगिकतेचा विपऱ्यास करणाऱ्या बातम्या कितपत दाखवाव्या, याचा विचार केला पाहिजे. लैंगिकतेसंदर्भात वैज्ञानिक आणि शास्त्रीय माहिती दिली पाहिजे. लैंगिक संबंध, नातेसंबंध आणि भाव-भावना यांचा एकत्रित विचार केला पाहिजे. माध्यमांमधून विविध प्रकारच्या लैंगिकतेविषयीच्या धारणा तयार होण्यास मदत होते. त्यामध्ये बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने धारणा तयार होतात आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यातूनच पॉर्नोग्राफीसारखे प्रकार पहावयास मिळतात. माध्यमांनी लैंगिकतेसंदर्भात संवेदनशीलपणे वृत्तांकन करून सजग, समंजस आणि निकोप समाज निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रयास सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा डॉ. तृप्ती दरक, अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी शरद आजगेकर, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे निवृत्त संचालक वसंतराव शिर्के, पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. राजश्री साकळे, डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील, अनमोल कोठाडिया, अश्विनी पाटील, अमोल मिणचेकर, तेजश्री शिंदे, मानस संस्थेच्या अध्यक्ष स्मिता पवार यांच्यासह मास कम्युनिकेशन विभाग, महावीर महाविद्यालय, सायबर, मानसशास्त्र आणि एमएसडब्ल्यू विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.