राजर्षी छत्रपती शाहू शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत घसघशीत वाढ
कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने राबवल्या जाणाऱ्या 'राजर्षी छत्रपती शाहू शिष्यवृत्ती' योजनेच्या रकमेत घसघशीत वाढ करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती २४०० ऐवजी महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती इतकीच म्हणजेच ५ हजार रुपये करण्यात आली आहे. अशी शिष्यवृत्ती देणारी कोल्हापूर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे.
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी व्हावी, यासाठी महापालिकेच्यावतीने दोन सराव चाचण्या आणि एक अंतिम सराव परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील पहिल्या २५ विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.
केवळ पाचवीच नव्हे, तर इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी 'कोल्हापूर टॅलेंट सर्च' (KTS), इयत्ता तिसरी व सहावीसाठी प्रज्ञाशोध परीक्षा आणि चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'स्कॉलरशिप परीक्षा' आयोजित करून महापालिकेने शिक्षणाचा एक आदर्श पॅटर्न उभा केला आहे.
विशेष म्हणजे मनपा शाळेत शिकणारे इयत्ता पहिली ते सातवी मधील सर्वच विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेला सामोरे जातात. सर्वच विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेणारी कोल्हापूर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील एकमेव महापालिका आहे.
आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रेरणेने आणि उपायुक्त किरणकुमार धनवाडे, प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शैक्षणिक प्रकल्प यशस्वीपणे राबवले जात आहे.
तत्कालीन उपायुक्त साधना पाटील यांच्या संकल्पनेतून या संपूर्ण प्रक्रियेत शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी आणि चंद्रकांत कुंभार यांचे विशेष योगदान लाभत आहे. तसेच परीक्षा विभाग प्रमुख संजय शिंदे व प्राथमिक शिक्षण समितीकडील सर्व कार्यालयीन कर्मचारी या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.