‘आमच्या शाळेसाठी मदत हवी आहे काका’ : जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनीने उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठवलं पत्र

<p>‘आमच्या शाळेसाठी मदत हवी आहे काका’ : जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनीने उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठवलं पत्र</p>

बीड – सध्या राज्यातील जिल्हा परिषद शाळेंची खूप बिकट अवस्था झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषद शाळेतील अंकिता कवचट या विद्यार्थिनीने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवारांना पत्र लिहून आपल्या शाळेची अवस्था सांगितली आहे.

 तिच्या या पत्रामुळे ग्रामीण भागातील शाळांचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. दरम्यान अंकिताने आपल्या पत्रात शाळेची दयनीय अवस्था मांडली आहे. शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वर्गखोल्यांची दुरवस्था, बसण्याची योग्य सोय, शैक्षणिक साहित्य अशा मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे म्हटले आहे. 

अंकिता कवचट हिने पत्रात म्हटले आहे कि, प्रति, अजित काका उर्फ दादा पवार 
विषय - आमच्या शाळेसाठी मदत हवी आहे काका... 
आदरणीय अजित दादा पवार साहेब 
(उपमुख्यमंत्री व पालकमंत्री बीड जिल्हा)

नमस्कार दादा आणि माझे काका मी बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकणारी एक साधी मुलगी आहे. आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या माणसाला पत्र लिहीत आहे. हात थरथरतोय पण मनातलं दुःख कोणाला तरी सांगायलाच हवा म्हणून धीर करून हे पत्र लिहीत आहे. 
दादा आमची ही शाळा नावापुरती नसून आमच्यासाठी ज्ञानमंदिर आहे. येथील सर्व शिक्षक वृंद आमच्यासाठी शिकवताना आमच्या भविष्यासाठी ज्ञानार्जनाची शिदोरी आमच्या कायम पाठीशी उभे राहतील, इतके ज्ञानी, सज्जन आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक वृंद आम्हाला लाभले आहेत. पण तिथे शिकण्यासाठी कुठलीच सोय नाही, पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, हात धुण्यासाठी हँडवॉश नाही, खेळण्यासाठी साधं साहित्यही नाही, तरीही आम्ही शाळेत येतो. कारण आम्हाला शिकायचं आहे.
पण दादा कागदावरच मात्र सगळं आहे असं दाखवलं जातं. आमच्या शाळेत सगळी व्यवस्था झाली आहे, असं सांगून लाखो रुपये काढले गेले आहेत, असं आम्हाला कळतंय. सरपंच बाईंचे पती हे सगळं पाहतात म्हणे, पण आम्हाला मात्र काहीच मिळालेलं नाही. आम्ही रोज रिकाम्या डोळ्यांनी शाळेकडे पाहतो. दादा आम्ही काय आयुष्यभर ऊसतोड मजूरच बनायचं का?,  आमची स्वप्न नाहीत का? आम्हालाही डॉक्टर, शिक्षक, अधिकारी व्हायचं आहे. पण शाळेतच सोय नसेल तर आम्ही कसं पुढे जाणार?, काका तुम्ही आमचे पालकमंत्री आहात, हा तुमचा जिल्हा आहे, आम्ही फार काही मागत नाही, फक्त शिकण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा, स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय, खेळाचे साहित्य आणि आमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारी व्यवस्था द्या. दादा हे माझं पत्र वाचताना कदाचित तुम्हाला मी फार लहान वाटेल. पण आमचं दुःख मोठं आहे. एकदा तरी आमच्या शाळेकडे लक्ष द्या. तुमच्या एका निर्णयाने आमचा आयुष्य बदलू शकतं.
आपलीच, 
परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषद शाळेतील एक विद्यार्थिनी