घरात घुसून सशस्त्र हल्ला करणाऱ्या 'त्या' पाच आरोपींची गांधीनगरमध्ये काढली धिंड...

<p>घरात घुसून सशस्त्र हल्ला करणाऱ्या 'त्या' पाच आरोपींची गांधीनगरमध्ये काढली धिंड...</p>

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे शंकर राठोड याच्या घरात घुसून त्याच्यावर सशस्त्र हल्ला करणाऱ्या किशन उर्फ बोबड्या कुंभार भाटी याच्यासह अन्य 5 जणांना गांधीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व  आरोपींची गांधीनगर पोलिसांनी  बाजारपेठ परिसरातून धिंड काढली.

शंकर  राठोड हे आपल्या कुटुंबीयांसह  करवीर तालुक्यातील  गडमुडशिंगी गावातल्या  प्रकाश नगर परिसरात राहतात. राठोड आणि किशन उर्फ बोबड्या कुंभार भाटी यांच्यात गेल्या काही दिवसापासून वाद आहे. दरम्यान बुधवारी रात्री पूर्व वैमनस्यातून किशन उर्फ बोबड्या कुंभार भाटी आणि त्याच्या  साथीदारांनी तलवार, एडका घेऊन शंकर राठोड यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. यात  राठोड  जखमी झाले आहेत. या प्रकरणी राठोड यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून गांधीनगर पोलिसात किशन उर्फ बोबड्या कुंभार भाटी  याच्यासह  बंड्या कोलप, प्रणव कांबळे, पिल्या लाड,रोहित उर्फ सत्यजित बागल या 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला  होता. या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ,पोलिसांनी त्यांना आरोपींना पोलिसी खाक्या दाखवत  गांधीनगर बाजारपेठेतून त्यांची धिंड काढली .