जुना राजवाडा - नवदुर्गा मिरवणुकीत ध्वनीमर्यादा उल्लंघन, गुन्हे दाखल

<p>जुना राजवाडा - नवदुर्गा मिरवणुकीत ध्वनीमर्यादा उल्लंघन, गुन्हे दाखल</p>

कोल्हापूर : कोल्हापूरात यंदाही शारदीय नवरात्र उत्सव उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.शनिवारी सायंकाळी शहरातील विविध सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांकडून नवदुर्गा मूर्तीच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकीत अनेक मंडळांनी मोठ्या प्रमाणावर साऊंड सिस्टिमचा वापर केला. मात्र, सायंकाळी वेळेनंतर, विशेषतः महाद्वार रोड परिसरात, ध्वनी मयदिचे उल्लंघन झाल्याचं पोलिसांच्या तपासणीत समोर आलंय. रात्री १० नंतर पोलीसांनी काही मंडळांचे साऊंड सिस्टिम बंद पाडले, तरीदेखील अनेक ठिकाणी कानठळ्या बसवणारा आवाज ऐकायला मिळाला. या प्रकरणात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात शहरातील अठरा मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये प्रसाद तरुण मंडळ, तटाकडील तालीम मंडळ, सत्यप्रकाश तरुण मंडळ, दत्त तरुण मंडळ, श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ, श्री महागणपती ग्रुप, बालाजी पार्क मित्र मंडळ, न्यू एकता तरुण मंडळ, गोल्डन बॉईज, शिवप्रेमी मित्र मंडळ अशी एकूण १८ मंडळं आणि त्यांच्या संबंधित ३६ साऊंड सिस्टिम व स्ट्रक्चर मालकांवर, अशा ५४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांनंतर संबंधित मंडळांचे अध्यक्ष आणि साउंड सिस्टिम मालकांना आता न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत.