कोल्हापूरमध्ये अनैतिक संबंधातून तरुणाचा खून : सात जणांवर गुन्हा दाखल, परिसरात तणाव

<p>कोल्हापूरमध्ये अनैतिक संबंधातून तरुणाचा खून : सात जणांवर गुन्हा दाखल, परिसरात तणाव</p>

कोल्हापूर -  फुलेवाडी रिंगरोडवरील नृसिंह कॉलनीत शुक्रवारी रात्री उशिरा एका अनैतिक संबंधातून उगम पावलेल्या वादातून महेश उर्फ प्रकाश राजेंद्र राख याचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी सात जणांविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय.

कोल्हापूर - फुलेवाडी रिंगरोड वरील गंगाई लॉन नजीकच्या नृसिंह कॉलनीत महेश राजेंद्र राख हा राहत होता. महेश याचे संशयित आरोपी आदित्य गवळी याची पत्नी कस्तुरीशी संबंध होते. कस्तुरी काही दिवसांपासून महेशच्या घरी राहत होती. तो तिच्याशी लग्न करणार होता. या कारणावरून आदित्य आणि त्याचा भाऊ सिद्धार्थ गवळी या दोघांचं महेश शी प्रचंड वैमनस्य निर्माण झालं होतं. यातूनच रात्री खुनाची घटना घडली.

रात्री एकच्या सुमारास सुरुवातीला हल्लेखोरांनी घरावर बियरच्या बाटल्या आणि दगडं मारून तोडफोड करत दहशत निर्माण केली. त्यानंतर संशयित आरोपी सिद्धार्थ गवळी, आदित्य गवळी आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यांनी मिळून तलवार, एडका, फायटर, काठी, लोखंडी गज आणि पाईपच्या सहाय्यानं महेश ला जबर मारहाण करून त्याचा नियोजनबद्ध खून केला. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. शुक्रवारी रात्री उशिरा अचानक घडलेल्या या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर इथं पाठवला. दरम्यान महेश च्या खून प्रकरणी ओकार शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिद्धार्थ गवळी, आदित्य गवळी, धीरज शर्मा, ऋषभ साळुंखे,मयूर कांबळे, पियुष पाटील, सद्दाम कुंडले यांच्या विरोधात करवीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.  

➡️महेश राख ची पार्श्वभूमी –
मृत महेश राख हा सराईत गुन्हेगार होता. तो हद्दपारची शिक्षा पूर्ण करून नुकताच शहरात दाखल झाला होता. परतल्यानंतर त्याचा निर्घृण खून झाल्याने गँगवॉरचा संशय बळावलाय. या घटनेमागे पूर्ववैमनस्य, वर्चस्ववाद किंवा गुन्हेगारी टोळ्यांतील अंतर्गत संघर्ष असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जातीय.

➡️स्थानिक नेत्याची या प्रकरणात चर्चा-
गेल्या काही दिवसांपासून यातील काही संशयितांचे फोटो स्थानिक राजकीय नेत्यासोबत डिजिटल पोस्टर्सवर परिसरात झळकले होते. या घटनेनंतर सर्व पोस्टर्स रातोरात हटवले गेले. त्यामुळे संबंधित नेत्याचा यामध्ये हस्तक्षेप आहे का? अथवा आरोपींना संरक्षण मिळाले का? याबाबत परिसरात चर्चेला उधाण आलंय