फलक आणि डीजे चा वाद विकोपाला: कोल्हापुरात दोन गट भिडले..वाहनांची तोडफोड, जाळपोळ

कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरातील राजेबाग स्वार दर्या जवळच्या भारत तरुण मंडळ प्रणित राजेबाग स्वार फुटबॉल क्लबचा ३१ वा वर्धापन दिन होता. या परिसरात मंडळाच्या वतीनं डिजिटल फलक उभारण्यात आले होते. सिद्धार्थनगर प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आलेल्या डिजिटल फलकावरून सिद्धार्थ नगर परिसरातील गट आणि राजेबाग स्वार दर्गा परिसरातील एक गट अशा तरूणांच्या दोन गटांमध्ये शुक्रवारी दिवसभर कुरबुर सुरु होती. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमाराला तरुणांचे दोन गट आमने सामने आले. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. ये-जा करणाऱ्या नागरिकांना दगड लागले. यात पळापळ झाल्यानं काही जखमी झाले. यातच या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मात्र दोन्ही बाजूचा जमाव इतका आक्रमक होता की पोलिसांसमोरच अनेकजण दगडफेक करत वाहनांची तोडफोड करत होते. काहींनी वाहनांची जाळपोळ केली. यामध्ये काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सुध्दा जखमी झाले. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्यासह शहरातील अन्य पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सिद्धार्थनगर परिसरातील दंगल थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मध्यरात्री सिद्धार्थनगर परिसरातील वातावरण काही प्रमाणात निवळलं. दरम्यान या दंगली प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी आज पहाटेच्या सुमाराला दोन्ही बाजूच्या दीडशे ते २०० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी आज सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज दिवसभर अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, गृह विभागाचे उपाधीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, लक्ष्मीपुरी चे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर याठिकाणी थांबून होते. दरम्यान दुपारी दीड वाजण्याच्या सुमाराला दोन्ही गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्या समवेत स्वतंत्र बैठका घेतल्या. यानंतर दोन्ही बाजूंकडून अशाप्रकारे कोणताही अनुचित प्रकार होणार नाही अशी ग्वाही पोलिसांना देण्यात आली. आज दुपार नंतर परिसरातील परिस्थिती हळूहळू पूर्व पदावर येत होती. मात्र आजही दिवसभर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.