मुरगूड शहरात घरफोड्यांची मालिका – लाखोंचा ऐवज आणि रोकड लंपास

कागल : मुरगूड शहराच्या महालक्ष्मी नगर आणि महादेव नगर या भरवस्तीत चार ठिकाणी घरफोड्या झाल्याची घटना समोर आलीय. यामध्ये चोरट्यांनी लाखोंचा ऐवज आणि रोकड लंपास केलीय. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय.
रात्रीच्या सुमारास ही घरफोडी झाली असून, अनिकेत सूर्यवंशी, प्रवीण पाटील, पारूबाई केसरकर आणि ज्योतीराम बोंडगेकाल यांची बंद असलेली घरं चोरट्यांनी लक्ष केली. ही घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली.
घरातील अलमारी, कपाटे फोडून सोनं, चांदीचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी पळवली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चोरीचा एकूण आकडा लाखो रुपयांच्या घरात असल्याची शक्यता आहे.
घटनेची माहिती मिळताच मुरगूड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून तपास सुरू केलाय. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरु आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीही मुरगूड शहरात अशाच प्रकारे घरफोड्यांचे प्रकार घडले होते. त्यानंतर पुन्हा अशा घटनांची पुनरावृत्ती झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण पसरलंय. स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा लवकरात लवकर तपास लावावा, अशी मागणी केलीय.