इचलकरंजीत दाम्पत्यावर खासगी सावकारीचा गुन्हा दाखल...

इचलकरंजी - शहरातील नदीवेस परिसरातील संजय शहा यांच्याकडे त्रिशला शेटे या कुटुंबियांसह भाड्याच्या खोलीत राहण्यास होत्या. त्यांचे पती राजू शेटे हे ट्रक व्यवसायात आहेत. शेटे यांनी आर्थिक अडचणीमुळे एप्रिल २०२४ मध्ये संजय शहा यांच्याकडून मुलाचे शिक्षण आणि ट्रक दुरुस्तीसाठी दरमहा १० टक्के व्याजाने वेळोवेळी ६ लाख ४३ हजार २४५ रुपये घेतले होते. त्यापोटी शेटे यांनी काही रक्कम शहा यांना रोख स्वरुपात दिली, तरीही पैसे देणे लागत असल्याच्या कारणावरुन जून २०२५ मध्ये शहा यांनी शेटे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी दोघांनीही त्यावेळी परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या होत्या. ६ लाख ४३ हजार २४५ या रक्कमेपोटी आजअखेर ८ लाख ८२ हजार ९७५ रुपये परत करण्यात आलेत तरीही शहा यांनी अजुनही ८ लाख ९ हजार रुपये येणेबाकी असल्याचे सांगत त्यासाठी दमदाटी, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद त्रिशला शेटे यांनी गावभाग पोलिसात दिली आहे. यावरून पोलिसांनी संजय शहा आणि सुनिता शहा या दाम्पत्यावर खासगी सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे.