जत्रेसाठी व्यावसायीकांकडून पैसे उकळणाऱ्या ‘त्या’ तीन पोलिसांचं निलंबन

कोल्हापूर - आषाढ महिन्यातील जत्रेसाठी व्यावसायिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार इस्पुर्ली पोलिस ठाण्यात घडला आहे. या प्रकरणी इस्पुर्ली पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अजित देसाई, अंमलदार पंकज बारड, अंमलदार कृष्णात यादव या तीन पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.
पैसे उकळण्याचा प्रकार पोलिसांकडून चालू असल्याची माहिती एका निवृत्त पोलिसाने पोलिस अधीक्षकांकडे केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी करवीरचे उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार क्षीरसागर यांनी त्या पोलिसांची चौकशी करून त्यांना पोलिस अधीक्षकांसमोर उभे केले आणि प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच ऑनलाईन पैसे स्वीकारल्याबद्दल कानउघाडणी केली. यापूर्वी या पोलिसांविरोधात त्र्यंबोली यात्रा व एसी बसविण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून तक्रारी आल्या होत्या. तसेच जुगार अड्ड्यावर छापा टाकून ताब्यात घेतलेल्या रकमेपेक्षा ती रेकॉर्डवर कमी दाखविल्याची तक्रारही करण्यात आली होती.