जुना राजवाडा पोलिसांत आमदार क्षीरसागर आणि उत्तम कोराणे यांच्या विरोधात तक्रार दाखल...

कोल्हापूर - जुना वाशी नाका परिसरात राहणाऱ्या अमित उर्फ सोन्या पाटील या कार्यकर्त्यांशी वाद झाल्याच्या रागातून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी फोनवरून शिवीगाळ केल्याची तक्रार मिलिंद वेसणेकर यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली होती. दरम्यान, आज अमित उर्फ सोन्या पाटील यांनी मिलिंद वेसणेकर याच्यासह राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आणि माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसांत तक्रार दाखल केलीय.
अमित उर्फ सोन्या पाटील आणि मिलिंद वेसणेकर हे दोघेही जुना वाशी नाका राजकपूर कपूर पुतळा परिसरात राहतात. स्थानिक तरुण मंडळातील वर्चस्व वादातून शुक्रवारी अमित पाटील आणि मिलिंद वेसणेकर या दोघांत वादावादी होवून परस्परांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी वेसणेकर यांच्या फिर्यादीवरून ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या विरोधात फोनवरून शिवीगाळ केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मिलिंद वेसणेकर याने आमदार राजेश क्षीरसागर आणि माजी नगरसेवक यांच्या नावे आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार अमित पाटील यांनी आज जुना राजवाडा पोलिसांत दाखल केलीय. तक्रारीत मिलिंद वेसणेकर,आमदार राजेश क्षीरसागर आणि माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांच्यापासून जीवितास धोका असल्याचं म्हटलंय.
दरम्यान, आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा रविकिरण इंगवले यांनी आरोप करत यापूर्वी देखील अमित उर्फ सोन्या पाटील याच्यावर प्राणघातक हल्ला झालाय. त्याच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास पोलीस प्रशासनानं आमदार क्षीरसागर आणि माजी नगरसेवक कोराणे यांना जबाबदार धरावे अशी मागणी केलीय.